हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 12 नोव्हेंबरला मतदान

Share This Story

निवडणूक आयोगाने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असून 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आगामी 12 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी व निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होईल. एकूण 68 जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तसेच 25 ऑक्टोबर पर्यंत नामांकन दाखल केले जाऊ शकेल. आगामी 27 ऑक्टोबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. तर 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले की, हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी संपणार आहे. राज्यात एकूण 55 लाख मतदार आहेत. यापैकी 15 लाख वोटर्स बॅलेटच्या माध्यमातून मतदान करतील. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 1.6 लाख आहे. एकूण 68 सदस्यीय विधानसभेत 2017च्या निवडणुकीत भाजपने 44 जागांवर विजय संपादित करत स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावे लागले होते आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

Join Channels

Share This Story