हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी : फडणवीस

Share This Story

नागपूर : नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या जी. एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी निर्दोश मुक्तता केली. हा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री दिली.

यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलिस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याबाबत सातत्याने मनात विचार येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Join Channels

Share This Story